शेतकऱ्यांना मिळाले ऊस पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान: पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनाचे मार्गदर्शन‎ – Divya Marathi


प्रतिनिधी| शनिशिंगणापूर
सोनई येथील कृषी महाविद्यालयाच्यावतीने ग्रामीण जागरूकता व कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नेवासे तालुक्यातील खेडलेकाजळी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार करत कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृषिदूत विद्यार्थ्यांनी ऊस पिकावरील संपूर्ण व्यवस्थापन या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. अतुल दरंदले यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाचे महत्त्व सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गावात राहून शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष समस्या जाणून घेता येतात. पिकांवरील कीड व रोग, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्याचे शास्त्रीय मार्ग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. प्रा. नरेंद्र दहातोंडे यांनी कांदा व ऊस पिकांवर येणाऱ्या प्रमुख कीड व रोगांची ओळख, एकात्मिक कीड व्यवस्थापन, कीटकनाशकांचा सूज्ञ वापर, जैविक व रासायनिक उपाय, कीड नियंत्रणासाठी सापळ्यांचा वापर, जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणा यावर प्रा. राहुल गडाख यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या. सूत्रसंचालन कृषिदूत पृथ्वीराज चौधरी यांनी तर आभार माजी सरपंच बाळासाहेब कोरडे यांनी मानले.
Copyright © 2024-25 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source