
नवी दिल्ली : पृथ्वीभोवती कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहांमध्ये पुन्हा इंधन भरण्याची सुविधा देणारे तंत्रज्ञान प्रात्यक्षिक स्वरूपात सादर करण्यासाठी चेन्नईस्थित अंतराळ स्टार्टअप ‘ऑर्बिटएड एअरोस्पेस’ सज्ज झाले आहे. या तंत्रज्ञानामुळे उपग्रहांचे आयुष्य वाढेल तसेच अवकाशातील कचऱ्याच्या समस्येवर उपाय करण्यास मदत होणार आहे.
‘ऑर्बिटएड एअरोस्पेस’ सोमवारी रोजी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) द्वारे ‘आयुलसॅट’ हे विशेष टँकर-उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेद्वारे उपग्रहामध्येच इंधन हस्तांतरण, वीज हस्तांतरण आणि डेटा ट्रान्सफरचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. हे सर्व स्टँडर्ड इंटरफेस फॉर डॉकिंग अँड रिफ्युएलिंग पोर्ट या प्रणालीद्वारे केले जाणार आहे.
‘प्रथम आम्ही उपग्रहातील एका टाकीतून दुसऱ्या टाकीत इंधन हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत,’ असे ऑर्बिटएडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शक्तिकुमार रामचंद्रन यांनी सांगितले.
‘आयुलसॅट’ हे कक्षेत तैनात केले जाणारे भारताचे पहिले व्यावसायिक डॉकिंग आणि री-फ्युएलिंग इंटरफेस ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच कक्षेत इंधन केंद्रे उभारली जातील, ज्यामुळे ‘लो अर्थ ऑर्बिट’ तसेच ‘जिओ-सिंक्रोनस’ कक्षेतील उपग्रहांचे आयुष्य वाढवणे शक्य होईल,’ असेही ते म्हणाले.
शक्तिकुमार यांनी सांगितले की, यंदा वर्षाखेरीस ऑर्बिटएड आणखी एक उपग्रह चेसर सॅटेलाइट- प्रक्षेपित करणार आहे. तो ‘आयुलसॅट’शी डॉकिंग करून प्रत्यक्ष कक्षेत उपग्रहांचे इंधन भरण्याचे प्रात्यक्षिक सादर करेल. २०२६ अखेरीस ‘चेसर सॅटेलाइट’च्या प्रक्षेपणासह आयुलसॅट आमच्या पहिल्या रेंडेव्हू, प्रॉक्सिमिटी ऑपरेशन्स अँड डॉकिंग (RPOD) मोहिमेसाठी लक्ष्य उपग्रह म्हणूनही कार्य करेल, असे त्यांनी नमूद केले.
या तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रात्यक्षिक सादर करणारा भारत चौथा देश ठरेल. ‘आयुलसॅट’ मोहीम कक्षेत आधारित अर्थव्यवस्थेचा पाया घालेल, ज्यात उपग्रहांची देखभाल, सेवा, इंधन भरणे आणि दीर्घकालीन टिकाव यांचा समावेश असेल.
🚨 Chennai-based OrbitAID Aerospace is set to launch AayulSAT, India’s first on-orbit refueling mission, aboard ISRO’s PSLV-C62 this month. 👏 pic.twitter.com/uBVGnTxq4z
अंतराळ मोहिमांना पाठबळ मिळेल
आयुलसॅटमुळे उपग्रहांचे आयुष्य वाढेल, कक्षीय कचरा कमी होईल आणि दीर्घकालीन व्यावसायिक तसेच मानवी अंतराळ मोहिमांना पाठबळ मिळेल. ही मोहीम भारताच्या डिब्रिस-फ्री स्पेस मिशन २०३० ला थेट गती देते आणि सेवा, इंधन भरणे व देखभाल यांवर आधारित कक्षीय अर्थव्यवस्थेचा पाया घालते, असेही स्टार्टअपने स्पष्ट केले.
© freepressjournal-marathi 2026